Friday, 20 October 2017

सोशल मीडियावर दिवाळी

       विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत गेल्यामुळे जग अगदी छोटे झाले आहे. याचाच एक भाग म्हणजे मोबाईल मधील क्रांती, जी आता प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. मागील दशकात रिलायन्स कंपनीने आपला मोबाईल बाजारात आणताना सांगितले, 'कर लो दुनिया मुट्ठी मे !', आणि ते वास्तवात उतरले. कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास मोबाईलचा आधार घेतला जातो.

       आज मोबाईलसाठी निरनिराळे लोकोपयोगी अँप्स तयार करण्यात आले आहेत. एखाद्या विषयाची माहिती देण्यासाठी, खरेदी-विक्री साठी, लहानांपासून ते मोठयांपर्यंत गेम्सचे अँप्स उपलब्ध आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात वापर होतो तो, व्हाट्सअप आणि फेसबुकचा ! एकाचवेळी कित्येक जणांना मेसेज पाठवून संपर्कात राहणे सहज शक्य झाले आहे. याकरीता समोरचा व्यक्ती ऑनलाइन आहे किंवा नाही हे पाहण्याची आवश्यकता नसते. मेसेज टाईप केला, फोटो पोस्ट केला की झाले. समोरच्या व्यक्तीला जेंव्हा वेळ मिळेल, त्यावेळी त्याने तो मेसेज किंवा फोटो पाहायचा. त्यावर comment द्यायची किंवा like करायचे. यापेक्षा अजून काही करावेसे वाटते तर, आपल्या मित्रांना forward करायचे.

         मोबाईलचा आविष्कार होण्यापूर्वी टेलीफोनचा वापर होत होता. त्यावेळी प्रत्येक सणाला लोक आपले मित्र, नातेवाईक यांना फोन करून शुभेच्छा देत असत. यामध्ये प्रत्येकाला एकमेकांबद्दल आदर असायचा. फक्त शुभेच्छा देण्यापुरते संभाषण मर्यादित नसून, त्यांच्या घरातील व्यक्तींची देखील विचारपूस केली जात असे. फोनवरील संभाषणामुळे मित्र व नातेवाईकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झालेली असायची.

           सध्या दिवाळी निमित्त व्हाट्सअप आणि फेसबुकवर भरपूर प्रमाणात शुभेच्छांचे मेसेज पाठविण्यात येत आहेत. प्रत्येक दिवसाचा नविन मेसेज पाठविला जात आहे. थोडावेळ मोबाईल नजरेआड झाला तर, 10-15 मेसेज सहज येतात. यात काही वाचले जातात, काही न वाचताच सोडून दिले जातात. तर काही नवीन असल्यास पुढे पाठवले जातात.

        सोशल मीडियामुळे आपण एकमेकांच्या touch मध्ये जरी असलो तरी संपर्कात नाही, असे वाटते. संपर्कात राहण्यासाठी आपले एकमेकांशी संभाषण होणे गरजेचे आहे. प्रत्येक सणाला नुसते शुभेच्छांचे मेसेज पाठवून आपुलकी निर्माण होणार नाही. फोन करून शुभेच्छा देण्यात जो आनंद मिळतो, तो फक्त मेसेज पाठवून मिळत नाही.

अजित दत्तात्रय केसरकर

6 comments:

  1. It's true...even we can not see actual feelings of a person through massaging...need face to face rapport to understand each other in a good way...nice picture at d end dada...

    ReplyDelete
  2. It's true...even we can not see actual feelings of a person through massaging...need face to face rapport to understand each other in a good way...nice picture at d end dada...

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete