Friday, 20 October 2017

सोशल मीडियावर दिवाळी

       विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत गेल्यामुळे जग अगदी छोटे झाले आहे. याचाच एक भाग म्हणजे मोबाईल मधील क्रांती, जी आता प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. मागील दशकात रिलायन्स कंपनीने आपला मोबाईल बाजारात आणताना सांगितले, 'कर लो दुनिया मुट्ठी मे !', आणि ते वास्तवात उतरले. कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास मोबाईलचा आधार घेतला जातो.

       आज मोबाईलसाठी निरनिराळे लोकोपयोगी अँप्स तयार करण्यात आले आहेत. एखाद्या विषयाची माहिती देण्यासाठी, खरेदी-विक्री साठी, लहानांपासून ते मोठयांपर्यंत गेम्सचे अँप्स उपलब्ध आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात वापर होतो तो, व्हाट्सअप आणि फेसबुकचा ! एकाचवेळी कित्येक जणांना मेसेज पाठवून संपर्कात राहणे सहज शक्य झाले आहे. याकरीता समोरचा व्यक्ती ऑनलाइन आहे किंवा नाही हे पाहण्याची आवश्यकता नसते. मेसेज टाईप केला, फोटो पोस्ट केला की झाले. समोरच्या व्यक्तीला जेंव्हा वेळ मिळेल, त्यावेळी त्याने तो मेसेज किंवा फोटो पाहायचा. त्यावर comment द्यायची किंवा like करायचे. यापेक्षा अजून काही करावेसे वाटते तर, आपल्या मित्रांना forward करायचे.

         मोबाईलचा आविष्कार होण्यापूर्वी टेलीफोनचा वापर होत होता. त्यावेळी प्रत्येक सणाला लोक आपले मित्र, नातेवाईक यांना फोन करून शुभेच्छा देत असत. यामध्ये प्रत्येकाला एकमेकांबद्दल आदर असायचा. फक्त शुभेच्छा देण्यापुरते संभाषण मर्यादित नसून, त्यांच्या घरातील व्यक्तींची देखील विचारपूस केली जात असे. फोनवरील संभाषणामुळे मित्र व नातेवाईकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झालेली असायची.

           सध्या दिवाळी निमित्त व्हाट्सअप आणि फेसबुकवर भरपूर प्रमाणात शुभेच्छांचे मेसेज पाठविण्यात येत आहेत. प्रत्येक दिवसाचा नविन मेसेज पाठविला जात आहे. थोडावेळ मोबाईल नजरेआड झाला तर, 10-15 मेसेज सहज येतात. यात काही वाचले जातात, काही न वाचताच सोडून दिले जातात. तर काही नवीन असल्यास पुढे पाठवले जातात.

        सोशल मीडियामुळे आपण एकमेकांच्या touch मध्ये जरी असलो तरी संपर्कात नाही, असे वाटते. संपर्कात राहण्यासाठी आपले एकमेकांशी संभाषण होणे गरजेचे आहे. प्रत्येक सणाला नुसते शुभेच्छांचे मेसेज पाठवून आपुलकी निर्माण होणार नाही. फोन करून शुभेच्छा देण्यात जो आनंद मिळतो, तो फक्त मेसेज पाठवून मिळत नाही.

अजित दत्तात्रय केसरकर

Wednesday, 18 October 2017

महाराष्ट्र पोलिसांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

आमच्यासाठी पोलीस व्हॅन वरील लुकलुकणारा दिवा म्हणजेच आकाश कंदिल,
पोलीस व्हॕनच्या सायरन चा आवाज म्हणजे फटाक्यांचा आवाज,
तर संकटात सापडलेला आणि आम्ही वाचवलेला अत्यवस्थ हीच आमची दिवाळी..!😊

*दिवाळी सणाच्या शुभेच्छा*
      *-महाराष्ट्र पोलीस*

        दिवाळीच्या शुभेच्छांच्या गर्दीत हा एक मेसेज व्हाट्सअपवर फिरत आहे. वाचल्यावर किती मनाला चटका लावून जाणारा वाटतो ! महाराष्ट्रात सगळीकडे धुमधडक्याने दिवाळी साजरी होत असताना, महाराष्ट्र पोलीस मात्र जनतेला दिवाळी आनंदात व सुखसमाधानात साजरी करता यावी, याकरीता चोवीस तास प्रयत्न करताना दिसतो. त्याला कधी सणासुदीला मिळणाऱ्या सरकारी सुट्टयांचा उपभोग घेता आलेला नाही, की एखादा सण आपल्या बायको, मुलांसोबत आनंद साजरा करता आला नाही. आपली व्यथा सरकार दरबारी मांडणे त्याच्यासाठी अशक्य आहे. मागील काही महिन्यांपासून सरकारने त्यांच्या बाबतीत सकारात्मक विचार करून हक्काची साप्ताहिक सुट्टी मिळवून दिली, हे एवढेच काय ते सुख ! पण त्यातही काही न काही अडचणी निर्माण होऊन क्वचितच सुट्टीचा आनंद घेता येतो. कोणत्याही धार्मिक सणाला कायदा व सुव्यवस्था राखली जावी, याकडे पोलीस कायम लक्ष ठेऊन असतो. जनतेला कोणताही त्रास सहन करावा लागू नये, एवढेच त्याचे ध्येय.

        कित्येक वेळेस जनतेला वेठीस धरून सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करण्याचे प्रकार विविध संघटनांकडून केले जात असल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे ऐन दिवाळी सणाचे तोंडावर एस. टी. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करण्याकरीता संपाचे हत्यार उपसले आहे. सणासुदीला मोठ्या प्रमाणात जनता एस.टी. प्रवास करते. ' एस.टी. चा प्रवास, सुखाचा प्रवास', अशा उद् घोषणा देऊन  जास्तीतजास्त लोकांना एस.टी. तून प्रवास करण्यासाठी आकर्षित केले जाते. आता देखील कित्येक जणांनी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी परगावी जाण्याचा बेत आखला असेल. पण या संपामुळे त्यांचा आनंदावर पाणी फिरले असेल. आता देखील पोलीस कोठेही दंगा होऊन सर्वसामान्य लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्त्यावर उभा राहून आपले कर्तव्य पार पडताना दिसतो आहे. लवकरच मंत्री महोदयांसोबत वाटाघाटी होऊन संंपावर तोडगा निघेल व पुन्हा सर्व काही सुरळीत होईल व जनतेचा प्रवास सुखकर होईल, ही आशा !

        जनता सुट्टीचा उपभोग कुटुंबासोबत घेत असताना, पोलीस मात्र आपले कर्तव्य पार पाडण्यात गुंतलेला दिसतो. याबाबत मनात खंत असताना देखील तो आपले मानसिक संतुलन बिघडू देत नाही. आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त करू शकत नसल्याने, सोशल मीडियाचा वापर करून काव्यात्मक पद्धतीने मांडलेले हे विचार किती हृदयस्पर्शी वाटतात. याचा कोठेतरी विचार होणे आवश्यक आहे. अशा महाराष्ट्र पोलिसांना सलाम केल्याशिवाय रहात नाही.

अजित दत्तात्रय केसरकर